src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

गुरुवार, 20 अक्तूबर 2016

Only Maratha कोन कोन करेगा लाइक इस spot ko. जय शिवाजी जय भवानी

शंभूराजांची मुत्सद्देगिरी
--

--
दक्षिणेत औरंगजेबाला वठणीवर आणायचे असेल, तर उत्तरेतील रजपूत आणि अकबराच्या मदतीने औरंगजेबाला शह देता येईल असा संभाजीराजांचा कयास होता. त्यांचा राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पडत होता. म्हणून संभाजींनी अकबराला मदत केली. संभाजीराजे आणि अकबर यांच्या संबंधांचा राजकीय संदर्भ लक्षात घेतला, तर संभाजीराजाची राजकीय मुत्सद्देगिरी अधोरेखित होते.

संभाजीराजांनी 24 ऑगस्ट 1680 रोजी बाकरेशास्त्री यांना दिलेल्या संस्कृत दानपत्रात आपले वडील शिवाजीराजे यांचे वर्णन करताना ‘दिल्लींद्र पदलिष्सव:’ म्हणजे ‘दिल्लीचे सिंहासन जिंकण्याचे ध्येय उराशी बाळगणारे’ असे विशेषण लावले आहे. शिवाजीराजांच्या या महत्त्वाकांक्षेविषयी मुंबईकर इंग्रज 16 जानेवारी 1678च्या आपल्या अहवालात लिहितात, ‘विजापूर घेतल्यावर थेट दिल्लीवर जाऊन प्रत्यक्ष औरंगजेबाला कैद करेपर्यंत आपला हा संघर्ष न थांबविण्याची प्रतिज्ञा शिवाजीराजाने देवीपुढे केली आहे.’ यावरून दिल्ली जिंकून संपूर्ण हिंदुस्थान आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचे शिवाजीराजांचे अंतिम ध्येय होते, असे म्हणता येईल.

त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजांनीही आपल्या उराशी हेच ध्येय बाळगले होते. त्यासाठी त्यांनी केलेले हे विलक्षण राजकारण आपण जाणून घेणार आहोत.

औरंगजेबाची महत्त्वाकांक्षा

मेवाड उर्फ उदयपूर हे राजस्थानातील एकमेव स्वतंत्र हिंदू राज्य होते. त्यांचे हे अस्तित्व औरंगजेबाला असह्य होत होते. तेव्हा औरंगजेबाने उदयपूरचे राज्य खालसा करण्याचा मनसुबा आखला. युध्दाला काहीतरी निमित्त असावे, म्हणून त्याने उदयपूरकरांकडे काही अन्यायकारी मागण्या केल्या. उदयपूरकरांनी आपली राजकन्या औरंगजेबाच्या मुलाला द्यावी, राज्यातील गोवधबंदी उठवावी, सर्व हिंदूंना जिझिया कर बसवावा व उदयपूर राज्यात मुस्लीम कायदा सुरू करावा. साहजिकच उदयपूरकरांनी या अन्यायकारी मागण्या धुडकावल्या व त्यासाठी कोणत्याही संघर्षाची तयारी सुरू केली.

औरंगजेबाने ही संधी मानून आपला शहजादा अकबर याला चाळीस हजारांची फौज देऊन 16 जानेवारी 1680 रोजी उदयपूरवर चालून जाण्याची आज्ञा केली. याला उत्तर देण्यासाठी उदयपूरचा राणा राजसिंह सिध्द झाला व त्याने सर्व रजपूत राजांना औरंगजेबाच्या या अन्यायाविरुध्द एकत्र येऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले.

याच सुमारास औरंगजेबाने जोधपूर राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. जोधपूरचा राजा जसवंतसिंह अफगाणिस्थानावर मोहिमेला जात असताना 10 डिसेंबर 1678 रोजी पेशावर येथे मृत्यू पावला. जसवंतसिंह हा औरंगजेबाशी अतिशय प्रामाणिक असलेला सेनानी होता. असे असतानाही औरंगजेबाने त्याच्या वंशजांचा वारसा नाकारून हे राज्य खालसा-जप्त करण्याचा डाव रचला होता. त्याप्रमाणे आपला हस्तक इंद्रसिंग याला जोधपूरचा जहागिरदार घोषित केले. याविरुध्द जसवंतसिंहाच्या राणीने बंड करून आपला ज्येष्ठ पुत्र अजितसिंह याला राजा जाहीर केले व दुर्गादास राठोड या पराक्रमी सेनापतीच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाविरुध्द संघर्षास सुरुवात केली. जयपूरकर, जोधपूरकर आणि उदयपूरकर या तिन्ही रजपूत सत्तांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला. औरंगजेब अडचणीत सापडला. तो महाधूर्त होता. त्याने जयपूरकर रामसिंगला तटस्थ राहावयास भाग पाडले. जोधपूरकरांशी तात्पुरता तह करून अजितसिंहाचा वारसा हक्क मान्य केला. त्यामुळे जोधपूरकर शांत झाले. परंतु त्यांचा सेनापती दुर्गादास राठोड याला हे मान्य न झाल्याने तो उदयपूरकरांना जाऊन मिळाला. त्याला औरंगजेबाचे अन्यायकारी धार्मिक धोरण मान्य होत नव्हते. याच सुमारास शहजादा अकबर मेवाडमध्ये आला. तो फार महत्त्वाकांक्षी होता. त्याला दिल्लीच्या तख्ताची आस होती. आपल्या बापाने म्हणजेच औरंगजेबाने ज्याप्रमाणे बापाविरुध्द बंड करून तख्त मिळविले, तसेच आपणही बादशाही प्राप्त करावी असा त्याचा विचार होता. या त्याच्या महत्त्वाकांक्षेला फुंकर घालून उदयपूरकर राजसिंहाने आणि दुर्गादास राठोडने त्याला सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन देऊन बंडखोरीस प्रवृत्त केले. अकबराने स्वत:स बादशहा घोषित करून राज्याभिषेक केला. स्वत:च्या नावाची नाणी पाडली. हे वर्तमान ऐकून औरगंजेब संतापला. तो स्वत: उदयपूरवर आक्रमण करावयास निघाला. त्याने उदयपूर आणि संपूर्ण मेवाड जाळून पोळून उद्ध्वस्त केले. त्याची धर्मांधवृत्ती अधिकच भडकली. त्याने उदयपुरातील तीन मंदिरांचा विध्वंस केला तर मेवाडमधील 173 मंदिरे उद्ध्वस्त केली. शेकडो गाई कापल्या. हिंदूंच्या कत्तली सुरू केल्या. तेव्हा उदयपूरकर परस्पर त्याला शरण गेले व त्यांनी औरंगजेबाशी तह केला. आता मात्र बंडखोर अकबर आणि त्याचा सहकारी दुर्गादास राठोड एकटे पडले. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर आशेचा एकच किरण होता, तो म्हणजे छत्रपती संभाजी.

अकबराची मदतीसाठी याचना

त्यांनी संभाजीराजांशी संधान बांधून त्यांच्या आश्रयाला महाराष्ट्राकडे कूच केले. 5 जून 1681ला नर्मदा पार करून 26 जुलै 1681ला तो तळकोकणात पोहोचला. येण्यापूर्वी संभाजीराजांना पाठविलेल्या आपल्या पत्रात अकबर लिहितो, ‘सर्व वैभवशाली राजांमध्ये श्रेष्ठ असलेल्या हे संभाजीराजा, तुमचे शौर्य आणि मर्दुमकी ऐकून मी तुझ्या राज्यात आलो आहे. माझ्याबरोबर माझा सच्चा मित्र दुर्गादास राठोड आहे. आपल्या सहकार्याने आणि अल्लाच्या कृपेने माझे राज्य मला प्राप्त झाले, तर नाव माझे आणि हे राज्य तुझे राहणार आहे. माझे वडील आलमगीर हे जसे तुमचे तसे माझेही शत्रू आहेत. हे आपण लक्षात घेऊन दोघांनी एकत्र होऊन आपले उद्दिष्ट साध्य होईल असा निश्चय केला पाहिजे. हे जग क्षणभंगुर आहे. फक्त आपले चांगले काम व शौर्याची कीर्ती मागे शिल्लक राहते.

राज्यावर आल्यापासून माझ्या वडिलांनी हिंदूंच्या नाशाचा विडा उचलला आहे. त्याची उदयपूरच्या राज्यावरील मोहीम आणि जसवंतसिंहाच्या मृत्यूनंतरचे त्यांचे राजकारण हे त्याचेच द्योतक आहे. मुघल साम्राज्यातील सर्व धर्मांची मंडळी ही आमचीच प्रजा आहे. त्यांचा विनाश म्हणजे आमच्याच राज्याचा विनाश, अशी माझी खात्री आहे. म्हणून राणा राजसिंह आणि दुर्गादास राठोड यांच्या सहकार्याने या दुष्कृत्याची सजा म्हणून बादशहाविरुध्द युध्द पुकारून त्यांना अधिकारावरून दूर करून राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बादशहाने कपटनीतीने आमच्या लष्करात बेदिली माजवून आमच्यात फूट पाडली व माझा विनाश आरंभला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या स्वाभिमानी व परोपकारी व्यक्तीवर रानोमाळ भटकण्याची पाळी आली आहे. बादशहाने माझ्या पाठलागावर शहजादा मुअज्जम याला रवाना केले आहे. अशा वेळी तुमचे शौर्य, पराक्रम आणि मुत्सद्देगिरी लक्षात घेऊन आपल्या सहकार्याने पुन्हा नवा संघर्ष करण्यासाठी मी आपल्याकडे येत आहे. जास्त काय लिहू?’ अकबराने संभाजीराजांना पाठविलेले हे पत्र 11 मे 1681 या तारखेचे आहे.

20 मे 1681ला पाठविलेल्या पत्रात अकबर लिहितो, ‘हे हिंदुस्थानातील श्रेष्ठ राजा, मागे लिहिलेल्या पत्रातील माझ्या प्रस्तावाप्रमाणे आपण दोघांनी एकत्र येणे आपल्या दोघांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य होईल. तेव्हा मी आपणास भेटावयास आतुर आहे.’

औरंगजेबाचे फासे

आपला पुत्र अकबराचे आणि रजपुतांचे बंड मोडल्यानंतर औरंगजेबाने अकबराला पाठविलेल्या पत्रात तो लिहितो, ‘माझ्या परमप्रिय अकबरा, मी तुझ्या सर्व अपराधांना माफ केले आहे. तेव्हा तू नि:संकोचपणे माघारी ये. त्या शैतानी रजपूतांच्या नादी लागून तू माझ्याविरुध्द जे बंड केलेस त्याला मी माफ करीत आहे.

तू राज्याचा लोभ धरून आपल्याच बापावर तलवार उपसलीस, हे तुझे कृत्य अत्यंत उध्दटपणाचे आणि अविचाराचे होते. मुलूख जिंकण्याची तुला एवढीच इच्छा असेल तर मी तुला मोठे सैन्य देतो, ते घेऊन तू इराण देशावर चालून जा. कारण इराणचा बादशहा शहा अब्बास याने आपल्या मुघल साम्राज्याचा कंधार सुभा जिंकून घेतला आहे. तो पुन्हा सोडव. खरे तर हेच तुझे कर्तव्य आहे. ते सोडून तख्त काबीज करण्यासाठी तू स्वत:च्या बापाविरुध्द संघर्ष करतो आहेस. हा अविचार सोडून तू मला शरण आल्यास मी तुला माफ करीन.’

वरील या दोन पत्रांवरून औरंगजेबाने अकबराला पुन्हा आपल्याकडे वळविण्याचा कसा प्रयत्न केला होता, हे दिसून येते. परंतु औरंगजेबाचा खुनशी व पाताळयंत्री स्वभाव अकबराला माहीत असल्यामुळे त्याला त्याच्याविषयी विश्वास वाटत नव्हता. कारण औरंगजेबाचे आपल्या भावाविषयींचे वर्तन, तसेच स्वत:चा ज्येष्ठ पुत्र मुहंमद सुलतान याच्याविषयीचे वर्तन अकबराला माहीत होते. म्हणूनच औरंगजेबाकडे पुन्हा जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला नसावा.

अकबराचे प्रत्युत्तर

याउलट औरंगजेबाला प्रत्युत्तर देताना तो लिहितो, ‘आपले आज्ञापत्र मला मिळाले. आपण अनेक प्रकारे उपदेश केला आहे. परंतु आपल्या अमीर उमरावांनाही आपल्याविषयी विश्वास वाटत नाही. आपल्यामुळे देशाची दुर्दशा झाली आहे. आपल्या राज्यातील हिंदू तर दुहेरी संकटात सापडले आहेत. एकतर आपण त्यांच्यावर भरमसाठ अन्यायकारी जिझिया लादला आहे व दुसरे शत्रूंच्या हल्ल्यांनी त्यांची स्थिती फार दारुण झाली आहे. असे असताना त्यांनी तुम्हाला दुवा का द्यावा? आपला राज्यकारभार दुष्ट व लबाड लोकांच्या हातात गेला आहे. असे असतानाही आपण त्यांनाच मोठेपणा देऊन त्यांच्या आहारी गेला आहात. तुमच्या राज्यात विद्वानांना दाराशी व मूर्खांना खलबतखान्यात प्रवेश मिळाला आहे. ही परिस्थिती माझ्याने पाहवत नाही व आपल्या स्वभावातही कधी बदल होण्याची शक्यता नाही. हा विचार करूनच मी प्रजेच्या कल्याणासाठी व मुघल सल्तनतीच्या हितासाठी हा आपल्याविरुध्दचा संघर्ष करीत आहे. यापुढे तरी राज्याची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवून स्वत: मक्केच्या यात्रेस जावे, म्हणजे यापुढे तरी लोक आपल्याबद्दल काही गौरवोद्गार काढतील.’

वरील पत्र वाचताच औरंगजेब फार संतापला व त्याने अकबराची नाकेबंदी करून त्याला ताबडतोब कैद करण्याचा आदेश दिला व या कामी कुचराई केल्याबद्दल शहजादा मुअज्जम याची खूप खरडपट्टी काढणारे पत्र 9 मे 1681 रोजी पाठविले. परंतु अकबर संभाजीराजांच्या आश्रयास येण्यास यशस्वी झाला. याविषयी मुघल इतिहासकार भीमसेन सक्सेना लिहितो, ‘अकबराचे हे येणे संभाजीला एक सुवर्णसंधी वाटली. त्याने अकबराचा मोठा सन्मान करून त्याची उत्तम व्यवस्था लावून दिली.’

आपल्या आश्रयाला आलेल्या अकबराला संभाजीराजांनी कोकणातील सुधागड किल्ल्याच्या परिसरात धोंडसे या गावाजवळ ठेवले होते. त्याच्या रक्षणासाठी 300 सैनिकांची नेमणूक केली होती.

औरंगजेबाची खलबते

अकबराला हाताशी धरून संभाजीराजांनी औरंगजेबाला पदच्युत करण्याची एक अत्यंत विलक्षण महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. याविषयी मुंबईवर इंग्रज 20 जून 1681ला सुरतेला पाठविलेल्या आपल्या बातमीपत्रात लिहितात, संभाजी राजे इतर हिंदू राजांना आपल्याबरोबर घेऊन औरंगजेबाला दूर करून अकबराला दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची योजना आखत आहेत. असे बोलले जाते की संभाजीराजे बुऱ्हाणपूर मोहिमेसाठी अकबरास आपल्याबरोबर घेऊन जातील. तेथे काही हिंदू राजे (रजपूत) त्यांना येऊन मिळण्याची शक्यता आहे. तेथून थेट दिल्लीवर आक्रमण करण्याचा त्यांचा बेत असावा.’

संभाजीराजांनी उत्तर हिंदुस्थानातील अनेक रजपूत राजांशी संधान बांधून हिंदूवर अन्याय करणाऱ्या औरंगजेबाविरुध्दच्या आपल्या मोहिमेत सामील होण्याचे ते आवाहन करीत होते.

धर्मरक्षणासाठी संभाजीराजांचे आवाहन

इ.स. 1682च्या नोव्हेंबर महिन्यात जयपूरच्या रामसिंहाला पाठविलेल्या आपल्या संस्कृत पत्रात संभाजीराजे लिहितात, ‘काही महत्त्वाच्या राजकारण्यांचा हेतू मनी धरून हे पत्र आपणास पाठवीत आहे. आपण सारे हिंदू दुबळे आणि सत्त्वहीन झालो आहोत. आपण स्वधर्म रक्षण करावयास असमर्थ आहोत, अशी त्या यवन बादशहाची (औरंगजेबाची) समजूत झाली आहे.

अशा दुष्ट यवन बादशहाच्या विरोधासाठी आपण त्याचे अनेक सेनापती मारले व काहींना तुरुंगात टाकले आहे. त्यामुळे त्याचे सामर्थ्य दुबळे झाले आहे. आता त्याला आपण तुरुंगात डांबले पाहिजे व देवळांची पुन्हा स्थापना करून सर्वत्र धर्माचे रक्षण केले पाहिजे. असा विचार करून आम्ही आपले आचरण करीत आहोत.

आपल्यापेक्षा आम्ही लहान आहोत. स्वधर्मनिष्ठा व शौर्य या आपल्या गुणांची कीर्ती आम्ही जाणून आहोत. आपण समर्थ आहात. म्हणूनच या महत्कार्याप्रसंगी आपले आम्हास साहाय्य झाल्यास निश्चितच यश प्राप्त होईल. असे असतानाही आपण आपले कर्तव्य विसरून स्वस्थ बसून आहात, याचे आम्हांस फार आश्चर्य वाटत आहे. आम्ही येथून जो संघर्ष करीत आहोत तोच तेथून आपण करावा. आता आम्ही शहजादा अकबर आणि दुर्गादास राठोड यांना सैन्यासह उत्तरेकडे पाठवीत आहोत. आपण आपले कर्तव्य मानून या गोष्टीत योग्य ते साहाय्य व धाडस दाखवावे.

आपल्या पिताश्रींनी (मिर्झाराजे जयसिंह) यांनी या दुष्ट यवनाला (औरंगजेबाला) दिल्लीचा बादशहा करून लौकिक संपादिला. तेव्हा आता तुम्ही व आम्ही मिळून (औरंगजेबाला) आलमगिरीला दूर करून शहजादा अकबराला बादशहा केल्यास स्वधर्माचे रक्षण होईल व आपला लौकिक होईल.

अधिक तपशील कवी कलशाच्या पत्रावरून तसेच जनार्दन पंडितांच्या पत्रावरून व प्रतापसिंहाचे तोंडून आणि हेरांकरवी समजेल. बहुत काय लिहिणे?’

संभाजीराजांनी इतक्या प्रभावी शब्दांत आपला उत्तुंग विचार व आपली महान योजना रामसिंहासमोर मांडून एकत्र येण्याचे आवाहन केले होते. परंतु निष्क्रिय व निस्तेज रामसिंहाने संभाजीराजांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याने आपले स्वत्व, निष्ठा, पराक्रम, अस्मिता ही आपल्या बापाप्रमाणेच त्या दृष्ट औरंगजेबाच्या पायाशी गहाण टाकली होती. त्याचमुळे संभाजीराजांचे हे सर्व राजकारण व्यर्थ गेले.

अकबराने रामसिंहाला असेच एक पत्र पाठवून आपल्याला सामील होण्याविषयी सुचविले. तो लिहितो,

‘बादशहा औरंगजेब तुम्हा हिंदूंशी कसे वागतो हे आपणास अवगत आहे. तुमचे पूर्वज आमच्या घराण्याशी वर्षानुवर्षे मोठया निष्ठेने सेवा करीत आलेले आहेत. यामुळे मला आपल्याविषयी मोठा आदर वाटत आहे. लवकरच मी सैन्यासह तिकडे येत आहे. तेव्हा तू तुझ्या फौजेसह मला येऊन मिळावे. असे केल्यास तुझा सन्मान वाढेल व तुझे उर्जित होईल हे जाणावे.
दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाशी संघर्ष करीत असतानाच अकबराला उत्तर हिंदुस्थानात पाठवून उत्तरेतील रजपुतांच्या साहाय्याने औरंगजेबाविरुध्द मोठी आघाडी उघडून मोठा शह द्यावा व त्याची राजधानी दिल्ली ताब्यात घेऊन त्याला निष्प्रभ करावे, ही संभाजीराजांची योजना फार अद्वितीय होती. परंतु रजपुतांसारख्या व अकबरासारख्या आळशी, रंगेल, निस्तेज आणि मूर्ख व्यक्तींमुळे ती सपशेल वाया गेली, हे संभाजीराजांचे दुर्दैव होय!

☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

कोई टिप्पणी नहीं: