src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

बुधवार, 26 अक्तूबर 2016

Like on post only Maratha


 🌾होय आम्ही शेतकरी®🌾

🔘रोप पद्धतीने मिळेल ऊस उत्पादनात वाढ🔘

 डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

ऊसरोप पद्धतीने बेण्याची बचत होते. एकरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते. प्रत्येक उसाचे वजन व प्रत वाढते. रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दीड महिना शेत कमी अवधीच्या पिकासाठी वापरता येते. रुंद सरी पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे सुलभ होतात.

 रोपवाटिकेत बडचीप (एक डोळा) पद्धतीने पॉली ट्रेमध्ये ऊस रोपनिर्मिती -
लागवडीच्या दोन डोळे टिपरी, तीन डोळे टिपरी, पॉली बॅग रोपे अशा विविध पद्धती आहेत. मात्र, रोप वाटिकेत बडचिप पद्धत सर्वांत प्रभावी आहे. यात बेणे खूप कमी लागते, उगवण चांगली मिळते. रोपांची निरोगी वाढ होते. वाहतूक सलग पद्धतीने करता येते.

🔘बडचीप निवड🔘

- सात ते नऊ महिने वयाच्या व दोन पेरामधील अंतर ७ ते ८ इंच असलेल्या भरीव जाडीच्या निरोगी उसाची निवड करावी.

- बडचिपर यंत्राच्या साहाय्याने बडचीप तयार करावी.

- बडचिपर हे यंत्र आडकित्यासारखे असून, त्याला लाकडी फळी, डोळा वेगळा करणारे धारदार पाते व हँडल असते. बडचिपरने ऊस डोळ्याचे नुकसान न होता ते व्यवस्थितरीत्या वेगळे करता येतात.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- बडचीप यंत्राने साधारणतः ताशी १५० पर्यंत चीप उसापासून काढता येतात. बडचीपमधील पाणी कमी होऊ नये म्हणून त्वरित सेंद्रिय व रासायनिक बेणेप्रक्रिया करून पॉली ट्रेमध्ये लागवड करावी.

🔘बेणे प्रक्रिया🔘

बेणे रोग व कीड मुक्त असावे. त्यासाठी त्यावर रासायनिक, तसेच जैविक बेणेप्रक्रिया करावी. सुरवातीस रासायनिक बेणेप्रक्रियेसाठी प्लॅस्टिक टबमध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये मॅलॅथिऑन ३० मि.लि. आणि कार्बेन्डाझिम १० ग्रॅम मिसळून घ्यावे. तयार केलेल्या द्रावणात बडचीप १० मिनिटे बुडवावीत. जैविक बेणेप्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्टर १ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू १२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बडचीप ३० मिनिटे बुडवून रोपनिर्मितीसाठी वापरावे.

🔘रोपवाटिकेची उभारणी🔘

- बडचीप पॉली ट्रेमध्ये आडवे न ठेवता डोळ्याचे टोक वर येईल, अशा पद्धतीने तिरकस ठेवावे. पॉली ट्रे कोकोपीटने भरून घ्यावे. पॉली ट्रेमध्ये पोकळी राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोकोपीटमध्ये कोरडेपणा असल्यास हलके पाणी शिंपडावे.

- भरलेले ट्रे एकमेकांवर रचून ठेवावेत. सर्वांत वर रिकामा ट्रे ठेवावा. प्रत्येकी २५ ट्रे असलेले चार संच असे १०० ट्रे एकत्र घेऊन पॉलिथीन शिटमध्ये घट्ट व एकसंधपणे बांधून घ्यावे. अशापद्धतीने तयार बंडलावर छोटे वजन ठेऊन त्याच अवस्थेत ३ ते ५ दिवस ठेवावे, जेणेकरून योग्य आर्द्रता मिळून डोळे अंकुरू लागतील.

- ट्रेचे बंडल शेडनेटमध्ये ठेवले असेल तर पाणी, हवा, सूर्यकिरणे ट्रेमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात रोपे तयार करायची असतील तर बल्ब लावून उबदार वातावरण तयार करावे. योग्य वातावरणात ३ ते ४ दिवसांमध्ये पांढऱ्या मुळ्या फुटून बाहेर येतात. पुढील २ ते ३ दिवसांत कोंबही उगवून येतात.

- ५ ते ८ दिवसांत कोंब फुटलेले सर्व ट्रे पॉलिथीन शिटमधून बाहेर काढावेत. रोपवाटिकेतच जमिनीवर पसरलेल्या पॉलिथीन शिटवर ते वेगवेगळे ठेवावेत.

- कोकोपिटमधील ओलाव्याचे प्रमाण पाहून पुढील १५ दिवस संध्याकाळच्या वेळेस झारीने पाणी द्यावे.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- रोप सहाव्या पानावर असताना (सुमारे २० दिवसांचे) गरजेनुसार पाणी वाढवावे.

- ५ x २ फूट अंतरावरील एक एकर लागवडीसाठी ५००० बडचीप (५० कोन असलेले १०० ट्रे) लागतात.

🔘रोपांची पुनर्लागवड🔘

- १० ते १२ इंच खोलीपर्यंत नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी अधिकाधिक मुरते. शेवटच्या नांगरणीपूर्वी ४ ते ५ टन सेंद्रिय खत प्रतिएकरी वापरावे.

- रोपे २५ ते ३० दिवसांची असताना रोपवाटिकेतून शेतात पुनर्लागवड करावी.

- पुनर्लागवडीपूर्वी एक दिवसआधी रोपास पाणी बंद करावे. त्यामुळे ट्रेच्या कोनामधील कोकोपीट हलके व मोकळे होतात.

- झिगझॅग पद्धतीने पुनर्लागवड केल्यास रोपास वाढीसाठी भरपूर जागा मिळते, अधिक फुटवे मिळतात. वापसा असलेल्या शेतात रोपांची काळजीपूर्वक लागवड करावी. त्यासाठी दोन फूट अंतरावर खोऱ्याने किंवा टोकदार लाकडी दांडक्याने लहान खड्डे तयार करावेत. खड्ड्यात थोडे सेंद्रिय खत टाकावे. लागवडीनंतर रोपाच्या बुंध्याला चोहोबाजूने माती लावून हलके दाबावे किंवा सरीमध्ये ३ ते ४ इंच उभ्या पाण्यात रोप कोकोपीटसह लावून हलके दाबून घ्यावे.

- पुनर्लागवडीच्या १ ते २ दिवस आधी शेताला पाणी द्यावे. तसेच सऱ्या पाण्याने दोन तृतीयांश उंचीपर्यंत भरतील याची काळजी घ्यावी.

🔘रुंद सरी पद्धतीचा वापर🔘

- पारंपरिक पद्धतीत दोन ओळींतील अंतर ९० ते १०० सें.मी. (तीन ते सव्वातीन फूट) ठेवले जाते. त्यामध्ये ३ डोळे असलेले १२ ते १६ हजार टिपरे प्रतिएकरी लावले जातात.

- साधारणतः ३० ते ४० टक्के उगवण होऊनसुद्धा ३ ते ४ महिन्यांत शेतात फुटव्यांची संख्या एक लाखापर्यंत असते. मात्र, उसाची संख्या कमी होत तोडणीच्या वेळी गाळपयोग्य असे फक्त २५ ते ३० हजारच्या आसपास ऊस मिळतात.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- रुंद सरी पद्धतीत ५ x २ फूट अंतरावर लागवड केली जाते. सरी रुंद असल्यामुळे आणि रोपांचे अंतर २ फूट असल्याने उसाची वाढ व विस्तार होण्यास अधिक जागा मिळते. शेवटी गाळपयोग्य ४५ ते ५० हजारापर्यंत ऊस मिळतात.

- रोप व्यवस्थित वाढू लागल्यानंतर जमिनीपासून १ इंच उंचीवर विशिष्ट कात्रीने जेष्ट कोंब कापावा. त्यामुळे अधिकाधिक फुटवे व गाळप योग्य ऊस तयार होतो. या पद्धतीचा वापर सुरवातीला छोट्या क्षेत्रावर करावा. त्यानंतर यशस्वीता पाहून पूर्ण क्षेत्रावर वापर करावा.

🔘पाणी व्यवस्थापन🔘

- पिकाला संपूर्ण कालावधीत वाढीनुसार आवश्यक पाणी द्यावे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा पीक वाढ आणि जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.

- पुनर्लागवडीनंतर पाण्याचे प्रमाण हे जमिनीचा प्रकार, पिकाचे वय, पाऊस, हवामान, ओलावा अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मुरमाड व हलक्या जमिनीत ७ ते १० तर भारी काळ्या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

- फुटव्यांच्या अवस्थेत (लागवडीपासून ३६ ते १०० दिवस) १० दिवसांतून एक वेळेस पाणी द्यावे. पिकाच्या जोमदार वाढीच्या काळात दर सात दिवसांनी पाणी द्यावे. नऊ महिने कालावधीपासून ते ऊस पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत १५ दिवसांनी एकदा पाणी द्यावे.

🔘एकात्मिक खत व्यवस्थापन🔘

- माती परीक्षणानुसार खतमात्रा द्याव्यात. संदर्भासाठी कृषी विद्यापीठांच्या खत मात्रा शिफारशींचा वापर करावा.

- रुंद सरी पद्धतीत आच्छादन, आंतरमशागत व बांधणीबरोबरच शिफारशीत खतांच्या मात्रा देणे शक्य होते.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

- पीकवाढीची अवस्था आणि शिफारशीनुसार खते विभागून द्यावीत.

🔘सेंद्रिय खते🔘

- आडसाली उसासाठी हेक्टरी ३० टन शेणखत किंवा पाचटाचे कंपोस्ट खत प्रतिहेक्टरी ७.५ टन, प्रेसमड केक प्रतिहेक्टरी ६ टन आणि गांडूळ खत प्रतिहेक्टरी ५ टन द्यावे. ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.

- रासायनिक खतांच्या मात्रा चार हप्त्यांत विभागून द्याव्यात.

- आडसाली पिकासाठी नत्र, स्फुरद, पालाश यांचे चार हप्ते खालीलप्रमाणे द्यावेत ः

- लागवडीच्या वेळेस नत्र ४० किलो, स्फुरद ८५ किलो, पालाश ८५ किलो.

- ६ ते ८ आठवड्यांनी नत्र १६० किलो.

- १२ ते १६ आठवड्यांनी नत्र ४० किलो.

- मोठी बांधणीच्या वेळीस नत्र १६० किलो, स्फुरद ८५ किलो, पालाश ८५ किलो.

१) ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूंची बेणेप्रक्रिया केलेल्या उसावर हंगामनिहाय रासायनिक नत्र खत मात्रा ५० टक्क्यांनी तर स्फुरदाची मात्रा २५ टक्क्यांनी कमी करून द्यावी.

२) को-८६०३२ या ऊस जातीची उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे रासायनिक खतांची हंगामनिहाय खत मात्रा २५ टक्केने जास्त द्यावी. अन्यथा ऊस बारीक पोसतो.

🔘सूक्ष्म अन्नद्रव्ये🔘

माती परीक्षणानुसार सूक्ष्मखतांच्या मात्रा द्याव्यात. सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनिज सल्फेट आणि ५ किलो बोराक्स प्रतिहेक्टरी कुजलेल्या शेणखतात (१०ः१ प्रमाणात) दोन दिवस मुरवून सरीत द्यावे. स्फुरदयुक्त खतांसाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. त्यामुळे गंधक व दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागत नाही.

डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

🔘सुधारित ऊस रोप लागवडीचे फायदे🔘

- बेण्याची बचत होते. एकरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते.

- पॉली ट्रेमध्ये रोपे तयार केल्याने पुनर्लागवडीसाठी लहान रोपांची वाहतूक सोपी होते.

- गाळपयोग्य उसाची संख्या जास्त, प्रत्येक उसाचे वजन व प्रत वाढते.

- हवा व सूर्यप्रकाश यांची उपलब्धता वाढते.

- रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दीड महिना उसाचे शेत मशागतीसाठी किंवा कमी अवधीच्या पिकासाठी वापरता येते.

- उत्पादन खर्चात बचत, रुंद सरी पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे सुलभ.

- भरणी केल्यामुळे पिकाच्या मुळांना आधार मिळून ते जमिनीवर लोळत नाही.

- रासायनिक व सेंद्रिय अशा दोन्ही प्रकारच्या खतांचा संतुलित वापर.

- आंतरपिकातून अतिरिक्त उत्पन्न.

- लागवड खर्चात २० ते ३० टक्के, मजूरसंख्येत २० ते ३० टक्के बचत.

- पाणी वापराची कार्यक्षमता ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढते. पाण्याची ४० ते ७०टक्के बचत.

- उत्पादनात २० ते ५० टक्के वाढ.

📝डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर

☎संपर्क : ओमप्रकाश हिरे  7588015491

📚 माहिती संदर्भ अग्रोवन

|| अन्नदाता सुखी भवः ||

अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866


कोई टिप्पणी नहीं: