src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

सोमवार, 24 अक्तूबर 2016

शेतकर्याचा या माहिती ला कौन लाइक करेल का लाइफ में फोटो एंड शेयर




 🌾होय आम्ही शेतकरी🌾

सुधारित पद्धतीने करा टोमॅटो लागवड -

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे. पेरू देशातील मुळची वनस्पती आहे. जगात उत्पन्नाच्या उतरत्या क्रमाने चीन, अमेरिका, भारत, टर्की, ईजिप्त या देशांत टोमॅटोचे पीक घेतले जाते. वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने टोमॅटो हे फळ आहे.
भारतात ओरिसा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगढ, गुजरात, इ. राज्यात टोमॅटोची लागवड होते तर नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हे महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व अनन्‍य साधारण आहे. टोमॅटो अ, ब आणि क जीवनसत्‍वे तसेच मॅग्नेशियम, लोह, तांबे, इत्‍यादी पोषक अन्‍नद्रव्‍येही टोमॅटो मध्‍ये पुरेशा प्रमाणात असतात. टोमॅटो खाल्ल्याने चरबीची वाढ रोखली जाते, हृदयविकाराच्या झटक्याला प्रतिबंध होतो. टोमॅटोमध्ये लायकोपेन हे ऍन्टीऑग्झिटंट असल्यामुळे ते शरीराची झीज रोखते आणि तारुण्याचे रक्षण करते. म्हणून नियमाने टोमॅटो खाणार्‍यांची त्वचा आणि केस तजेलदार असतात. लायकोपेनच्या समावेशामुळे टोमॅटो अनेक प्रकारच्या कर्करोगांशी सामना करण्यास उपयुक्त ठरते. विशेषत: महिलांमधील गर्भाशयाचा कर्करोग टोमॅटोमुळे रोखला जाऊ शकतो. टोमॅटोतील क जीवनसत्त्व आणि कॅल्शियम यांच्यामुळे हाडे मजबूत होतात, दृष्टी चांगली राहते. मधुमेहाच्या रुग्णामध्ये ब्लड शुगरचे प्रमाण आणि समतोल राखण्यासाठी टोमॅटो खाणे उपयुक्त ठरू शकते.
टोमॅटोचे वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक प्रकारे खाता येते. टोमॅटोची कच्‍ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोशिंबीरीसाठी वापरली जातात. तसेच टोमॅटोच्‍या पिकलेल्‍या फळांपासून सुप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्‍युस इत्‍यादी पदार्थ बनविता येतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्व वाढलेले आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये व इतर देशांमध्ये अशा प्रक्रिया पदार्थांच्य निर्यातीस भरपूर वाव आहे.

जाती :
अर्का गौरव : फळ गडद लाल मांसल व टिकावू असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल पर्यंत
धनश्री : ही जात तिन्ही हंगामात येणारी असून मध्यम वाढणारी, फळे मध्यम गोल आकाराची, नारंगी रंगाची असतात. या जातीचे सरासरी उत्पादन 80 ते 90 टन प्रति हेक्‍टर मिळते. ही जात स्पॉटेड विल्ट आणि लिफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.
पंजाब केसरी : ही जात 'रूपाली' ह्या टोमॅटोच्या जातीसारखी चालते, बिगर तारेची, गर भरपूर असलेली, कमी पाण्यामध्ये जिद्दीने वाढणारी असल्यामुळे उन्हाळ्यात लागवड करतात. खेडेगावात भरपूर मागणी असते.
पंजाब छुआरा : या टोमॅटोच्या जातीची फळे गुच्छाने येतात. सर्वसाधारण भागातील शेतकऱ्यांसाठी परवडणारी, कमी खर्चिक जात असून लागवड उन्हाळ्यात करतात.
पुसा १२०: ही जात निमॅटोडला प्रतिकारक आहे. झुडूपासारखी वाढणारी असून फळे मध्यम गोल आणि आकर्षक लाल रंगाची असतात.
पुसा अर्ली ड्वॉर्फ : झुडूपासारखी बुटकी असून लवकर व तिन्ही हंगामात येणारी जात आहे. फळे मध्यम आकाराची गोल व पूर्ण लाल रंगाची असतात. इकरी १४ टन उत्पादन देते.
पुसा गौरव : ही जात झुडूप वजा वाढणारी आहे. फळे लांबट गोल पिकल्‍यावर पिवळसर लाल रंगाची होतात. वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 400 क्विंटल
पुसा रूबी : तिन्ही हंगामात चांगले उत्पन्न देणारी ही जात असून लवकर येणारी आहे. फळे मध्यम चपट्या आकाराची गर्द लाल रंगाची असतात. तसेच विषाणूजन्य रोगांना कमी प्रमाणात बळी पडते. एकरी १२ ते १३ टन उत्पादन देते.
पुसा शितल : हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्‍य जात असून फळे चपटी गोल लाल रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 350 क्विंटल
फुले राजा : फळे नारंगी लाल रंगाची असतात. ही संकरित जात लिफकर्ल, व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. प्रति हेक्‍टरी 55-60 टन उत्पादन मिळते.
भाग्यश्री : ही जात मध्यम वाढणारी असून फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, गोल लांबट पूर्ण लाल रंगाची असून गराचे प्रमाण जास्त असते.  या जातीच्या फळात लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत. या जातीचे सरासरी उत्पादन 75 ते 89 टन प्रति हेक्‍टर मिळते.
मार्ग्लोब : या जातीची फळे मध्यम त मोठ्या आकाराची गोल व तांबडी रसरशीत असतात. कॅनिंगसाठी उत्तम आहे.
राजश्री : फळे नारंगी रंगाची, लाल रंगाची असतात व या संकरित वाणाचे उत्पादन 80 ते 90 टन प्रति हेक्‍टर मिळते. ही संकरित जात लिफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.
रोमा : या जातीचे झाडे लहान असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्‍याने वाहतूकीस योग्‍य आहे. हेक्‍टरी उत्‍पादन 25 टन. टोमॅटो पेस्टसाठी उत्तम आहे.
तसेच रूपाली, अर्का विकास,  बेस्ट ऑफ ऑल, राणा, एस-१२, वैशाली, शितल, अभिनव, अनुप, इ. जातींचीही लागवड महाराष्ट्रामध्ये केलेली दिसून येते.

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

हवामान :
टोमॅटो हे समशितोष्ण वातावरणात येणारे पीक आहे. अति थंडी पडल्‍यास टोमॅटोच्‍या झाडाची वाढ खुंटते. तापमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो. १३ ते ३८ अंश सेल्शिअस या तापमानास झाडाची वाढ चांगली होती. फूले आणि फळे चांगली लागतात. रात्रीचे तापमान १८ ते २० सेल्शिअस दरम्‍यान राहिल्‍यास टोमॅटो ची फळधारणा चांगली होते. फळांना आकर्षक रंग आणणारे लायकोपिन रंगद्रव्‍य २६ ते ३२ अंश सेल्शिअस तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते. तापमान, सुर्यप्रकाश आणि आद्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्‍या वाढीवर होतो. २० ते ३२ अंश सेल्शिअस तापमान, ११ ते १२ तास स्‍वच्‍छ सुर्यप्रकाश आणि ६० ते ७५ टक्‍के आर्द्रता असेल त्‍यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्‍पादन मिळते.

जमिन :
टोमॅटोचे मुळ हे सोटमुळ असल्याने मध्यम खोलीची पोयट्याची, भरपूर निचरा होणारी सुपीक जमीन या पिकाला मानवते व शास्त्रीय दृष्ट्याही अशी जमीन योग्य ठरते. परंतु टोमॅटोच्या केशमुळ्या ह्या जमिनीच्या वरील १ फुट थरात पसरत असल्याने हलक्या जमिनीत हे पीक घेतले जाते. हलक्‍या जमिनीत पाण्याचा निचरा होत असल्याने पिकांची वाढ चांगली होते व पीक लवकर तयार होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पवुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्‍याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्‍यम प्रतिचा म्‍हणजे ६ ते ८ असावा. भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो. परंतु उत्पादन भरपूर निघते. पावसाळी टोमॅटो पिकासाठी काळीभोर जमीन टाळावी तर उन्हाळी टोमॅटो पीक हलक्‍या व उथळ जमिनीत घेऊ नये. क्षारयुक्त चोपण व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व फुलगळ होते.

लागवड :
महाराष्‍ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर म्हणजे तीनही हंगामात, जुन-जुलै (खरीप), सप्टेंबर-ऑक्टोबर (रब्बी), जानेवारी-फेब्रुवारी (उन्हाळी) केली जाते. लागवडीसाठी लागणारी टोमॅटोची रोपे नर्सरीतून विकत आणण्याएवजी घरी तयार करावीत. एक एकर क्षेत्रासाठी एक गुंठा क्षेत्रावर रोपवाटिका करावी. संकरित वाणांसाठी १००-१२० ग्रॅम बियाणे एकरी क्षेत्रासाठी पुरेसे असते. बीजप्रक्रियेसाठी थायरम किंवा ट्रायकोडर्मा आणि त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कूज हे रोग नियंत्रणात राहतात. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून घ्यावीत. यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे.
रोपे तयार करण्‍यासाठी बियांची पेरणी गादी वाफयावर करावी. गादी वाफा तयार करण्‍यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्‍या २, ३ पाळया देऊन जमिन भुसभूशीत करावी. गादी वाफा हा १ मीटर रूंद ३ मीटर लांब व १५ से.मी. उंच असावा. गादी वाफयात १ घमेले शेणखत ५० ग्रॅम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा. बियांची पेरणी ही वाफयाच्‍या रूंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्‍यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे. वाफयास झारीने पाणी द्यावे. बी उगवून आल्‍यानंतर १० ते १२ दिवसांनी दोन ओळीत काकरी पाडून प्रति वाफयास १० ग्रॅम फोरेट द्यावे. वाफे हे तणविरहीत ठेवावेत. किडी-रोग नियंत्रणासाठी शिफारसीनुसार औषधांच्या फवारण्या कराव्यात. बी पेरणीं पासून २५ ते ३० दिवसांनी म्‍हणजे साधारणतः रोपे १२ ते १५ सेमी उंचीची झाल्‍यावर रोपांची सरी वरंब्‍यावर पुर्नलागवड करावी. रोपे उपटण्‍यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्‍ध होतात. रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्‍याकाळी किंवा उन कमी झाल्‍यावर करावी.
ज्या जमिनीत टोमॅटो, भेंडी, वांगी, बटाटा, वेलवर्गीय भाज्या व फळे आधीच्या हंगामात केली असतील तिथे टोमॅटोचे पीक घेण्याचे टाळावे. तेथे पहिल्या पिकावरील राहिलेल्या रोगांचे जंतू-कीड पटकन या पिकांचा आश्रय घेतात व त्यामुळे किडी-रोगांचा खूप प्रादुर्भाव दिसून येतो.
शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखारणी द्यावी. जमिनीत हेक्‍टरी ३० ते ४० गाडया शेणखत मिसळावे. हंगामानुसार व जमिनीनुसार लागवड अंतर ठेवावे. हलक्या व मध्यम जमिनीत जोड ओळ पद्धतीने लागवड करावी. जोडओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास रोपारोपातील अंतर उन्हाळी हंगामात १.६ ते २ फूट ठेवावे, पावसाळी व रब्बी हंगामात २ ते २.६ फूट ठेवावे. एकाच ओळीत लागवड करावयाची असल्यास रोपारोपातील अंतर उन्हाळी हंगामात १ ते १.३ फूट ठेवावे, पावसाळी व रब्बी हंगामात १.६ ते २ फूट ठेवावे. भारी जमिनीत उन्हाळी हंगामात एक ओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास रोपारोपातील अंतर १.६ फूट तर रब्बी हंगामात २ फूट ठेवावे. भारी जमिनीत जोडओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास उन्हाळी हंगामात २ ते २.६ फूट तर रब्बी हंगामात २.६ फुटापेक्षा जास्त ठेवावे.
लागवड करण्यापूर्वी गादीवाफा ठिबक सिंचनाने चांगला भिजवून ओला करावा. या वेळेस ठिबक सिंचनातून ट्रायकोडर्मा एकरी ३ लिटर सोडावे. जर परिसरामध्ये किंवा लागवडीच्या शेतात जीवाणूजन्य मर येत असेल तर सुडोमोनास एकरी ३ लिटर सोडावे. रोपे लागवड करताना रोपांच्या रूट बॉलला धक्का लावू नये. रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. त्यामुळे नाजूक खोड ताबडतोब पिचते व अशी रोपे नंतर दगावतात. लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांच्या आत ज्या रोपांची मर झाली असेल त्या ठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून घ्यावेत.

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

रोपनिर्मितीसाठी प्रो ट्रे:
प्रो ट्रे किंवा सीडलिंग ट्रे विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनवितात. सर्वसाधारणपणे १०४ कप असलेला व कपाची खोली चार ते पाच सें.मी. असलेला प्रो ट्रे वापरावा. एक प्रो ट्रे भरण्यासाठी सर्वसाधारणपणे एक किलो कोकोपिटची आवश्‍यकता असते. एक भाग कोकोपिट व एक भाग गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट खत मिसळून घ्यावे. तयार झालेले माध्यम निर्जंतुक करून घ्यावे. हे माध्यम प्रो ट्रेमध्ये भरण्यापूर्वी ओले करून घ्यावे व प्रो ट्रेमध्ये दाब देऊन भरावे. कपाच्या तोंडाशी थोडी जागा रिकामी ठेवावी व एक  सें.मी. खोलीवर प्रत्येक कपात एक बी या प्रमाणे बी लावावे व कोकोपिट मिश्रणाने प्रो ट्रे पूर्णपणे भरून घ्यावा. बी लावलेले प्रो ट्रे एकावर एक दहा याप्रमाणे रचून गोणपाटाने झाकून ठेवावे. तीन दिवसांत बी उगवल्यानंतर प्रो ट्रे मोकळ्या जागेत सूर्यप्रकाशात पसरून ठेवावेत व झारीच्या साहाय्याने हलकेच पाणी द्यावे.
प्रो ट्रे वापराचे फायदे :
प्रो ट्रेत वाढविलेली रोपे लावणीयोग्य होण्यासाठी १८ ते २१ दिवस लागतात, तर गादीवाफ्यावर वाढविलेल्या रोपांना हेच २६ ते ३० दिवस लागतात.
प्रो ट्रेमधील रोपांमध्ये ९४ ते ९७ टक्के उगवण मिळते. अशा रोपांच्या लावणीनंतर दोन ते पाच टक्के एवढे नांगे पडतात. गादी वाफ्यावरील रोपांची उगवणक्षमता ५५ ते ६० टक्के मिळते आणि लावणीनंतर १२ ते १५ टक्के नांगे पडतात.
लावणीनंतर प्रो ट्रेमधील रोपांची वाढ जलद होते. त्यामुळे तीन तोडे गादीवाफ्यावरील रोपांपेक्षा जास्त मिळतात. याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होतो.
प्रो ट्रेमधील रोपांची वाढ एक समान होऊन मुळ्यांमधील वाढ जास्त मिळते. यामुळे अशी रोपे पॉलिथिन मल्चिंगवर लागवड करण्यासाठी अतिशय योग्य असतात.
पॉलिमल्चिंगवर लागवड :
एका बंडलमध्ये ४०० मीटर लांबीचा कागद बाजारात उपलब्ध असून वरील बाजूस चंदेरी व खालील बाजूस काळा रंग असलेला किंवा दोन्ही बाजूंस काळा रंग असलेला कागद वापरणे फायदेशीर दिसून आले. पाच फूट अंतरावर गादी वाफे काढल्यास एकरी सहा बंडल लागतात. केंद्राने विविध रंगांच्या पॉलिथिन पेपरच्या वापराचे प्रयोग केले. त्यात निळा-निळा, तांबडा-तांबडा, काळा-काळा या रंगांच्या पेपरमध्ये काळा-काळा व चंदेरी-काळा रंगांचे पेपर वापरणे फायदेशीर दिसून आले.
मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे :
टोमॅटो पिकातील तणांचे नियंत्रण
मजुरांची मोठ्या प्रमाणात बचत
पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत
पाण्यात विरघळणारी खते वाफ होऊन उडून जात नाहीत. परिणामी खतांची बचत जास्तीची थंडी किंवा उष्ण तापमान यापासून संरक्षण.
मातीचे तापमान नियंत्रित राहते. परिणामी, अन्नद्रव्यांचे विशेषतः थंडीमध्ये चांगले शोषण. मातीचे योग्य तापमान राखल्यामुळे जिवाणूंची चांगली वाढ.
अतिवृष्टीपासून उंच गादीवाफ्याचे, परिणामी पिकांचे चांगले संरक्षण टोमॅटोच्या फळांचा मातीशी संपर्क न आल्यामुळे फळांची प्रत सुधारते.
रोग व किडींचे चांगले नियंत्रण

खत व्यवस्थापन :
साधारणपणे एकरी १० ते १२ टन सेंद्रिय खते टाकावीत. गादिवाफे तयार करताना कोणत्याही रासायनिक खतांचे बेसल डोस देऊ नये. सरळ वाणांसाठी एकरी ८०-५०-५० व संकरीत वाणांसाठी १००-७०-७० किलो नत्र, स्‍फूरद पालाश या प्रमाणात खत द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४०, ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. याशिवाय संकरित व सुधारित आणि सरळ वाणासाठी एकरी १० किलो फेरस सल्फेट, १० किलो मॅगेनीज सल्फेट, ३ किलो कॅल्शियम सल्फेट, २ किलो बोरॅक्‍स आणि १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट ७, ३०, ६०, ९० दिवसांनी सम विभागून द्यावे. जैविक खतांमध्ये एकरी २ किलो ऍझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जिवाणू हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.

पाणी व्‍यवस्‍थापन :
रोपांच्‍या लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे आणि त्‍यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. पावसाळयात टोमॅटो पिकास ८ ते १० दिवसांच्‍या अंतराने तर हिवाळी हंगामात ५ ते ७ दिवसांच्‍या अंतरानी व उन्‍हाळी हंगामात ३ ते ४ दिवसांच्‍या अंतरानी रोपांना पाणी द्यावे. भारी काळया जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पाणी देताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात. हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात. भारी जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात. पिक फूलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्‍वाचे आहे. फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे, फळे तडकणे या समस्या निर्माण होतात. पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते. पिकाच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे. पाणी देण्यास ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्‍याची ५० ते ५५ टक्‍के बचत होऊन उत्‍पन्‍नात ४० टक्‍के वाढ होते. ठिबक संचामधून पाणी देताना दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढे पाणी मोजून द्यावे.

श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

तण व्यवस्थापन :
नियमित खुरपणी करून तण काढून टाकावेत. खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जेणेकरून त्‍याचा उत्‍पन्‍नावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
पुर्नलागवड केलेल्या टोमॅटोमध्ये तणनाशक वापरताना त्यांचा पिकाशी संपर्क होवू नये याची काळजी घ्यावी. जमिनी लगत फवारणी करावी. हवामानाच्या तणावमुळे अशक्त पिकात फवारणी करु नये.

आधार देणे :
टोमॅटो पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्‍यामुळे त्‍यांना आधाराची आवश्‍यकता असते. आधार दिल्‍यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्‍याशी संपर्क येत नाही. त्‍यामुळे फळे सडण्‍याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात. टोमॅटोच्‍या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो.
१. प्रत्‍येक झाडाजवळ दिड ते दोन मीटर लांबीची व अडीच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्‍या वाढीप्रमाणे काठीला बांधत जावे.
२. या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठयांचा वापर करून ताटी केली जाते आणि या ताटीच्या  आधारे झाडे वढविली जातात. सरीच्‍या बाजूने प्रत्‍येक १० फूट अंतरावर पहारीने दर घेऊन त्‍यात दिड ते दोन मीटर उंचीच्‍या आणि अडीच सेमी जाडीच्‍या काठया घट्ट बसवाव्‍यात. सरीच्‍या दोन्‍ही टोकांना जाड लाकडी दाम बांधाच्‍या दिशेने तिरपे रोवावेत. प्रत्येक डांबाच्‍या समोर जमिनित जाड खुंटी रोवून डाम खुंटीशी तारेच्‍या साहारूयाने ओढून बांधावेत. त्‍यानंतर १६ गेज ची तार जमिनीपासून ४५ सेमी वर एका टोकाकडून बांधत जाऊन प्रत्‍येक काठीला वेढा आणि ताण देऊन दुस-या टोकापर्यंत ओढून घ्‍यावे अशा प्रकारे दुसरी ९० से.मी. वर व तिसरी १२० से.मी. अंतरावर बांधावी. या तारेंना रोपांच्‍या वाढणाऱ्या फांद्या सुतळी किंवा नॉयलॉनच्‍या दोरीने बांधाव्‍यात.
टोमॅटोची बांधणी करताना झाडाच्या प्रत्येक फांदीला स्वतंत्रपणे सूर्यप्रकाश मिळेल हे पाहावे. टोमॅटोचे खोड मजबूत करण्‍यासाठी झाडाला वळण देणे आवश्यक असते.

कीड-रोग व्यवस्थापन :
कीड व रोग नियंत्रणासाठी दररोज शेताची सकाळी व संध्याकाळी पाहणी करावी. किडींचा व रोगांचा अभ्यास करावा. एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या पद्धतींचा अवलंब करणे फायद्याचे वाटते. सर्वसाधारणपणे टोमॅटो पिकावर दर आठवड्याला कमीतकमी एक फवारणी घ्यावी लागते.
किडी:
१) मावा, तुडतुडे व फुलकिडे : या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते. पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात आणि विषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय उपलब्ध नाही.
२) पाने खाणारी अळी : पानाचा आतील भाग नागमोडी आकाराचा पोखरते, खाल्लेला भाग पांढरा होतो. पान वाळते, फळे व शेंडा खाल्ल्याने उत्पादन घसरते.
३) कटवर्म : रोपांचे कोवळे खोडे जमिनीलगत कापते, दिवसा लपून राहिल्याने दिसत नाही.
४) फळे पोखरणारी अळी : मादी पतंग पानावर, फुलांवर अंडी घालतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पाने खाऊन वाढते. नंतर फळे आल्यावर फळे खाऊ लागते. अळी फळावर छिद्रे पाडून पुढील अर्धे शरीर फळांत ठेवते. त्यमुळे फळे सडतात. जानेवारी ते मे दरम्यान या अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.
५) पाने पोखरणारी अळी : अळी रंगाने पिवळी असते. माशी अगदी लहान असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही. परंतु अळीमुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते. ही अळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढर्‍या नागमोडी रेषा पडतात. किडीच्या प्रादुर्भावमुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते. त्यामुळे उत्पादन घटते.
रोग :
१) रोप कोलमडणे किंवा रोपांची मर : राझोक्टोनिया, फायटोप्थ्रोरा किंवा पिथियम या बुरशीमुळे हा रोग होतो. त्यामुळे वाफ्यातील रोपे जमिनीलगत कुजतात आणि कोलमडून सुकून जातात.
२) करपा : हा रोग अल्टरनेरिया सोलानाई या बुरशीमुळे होतो. जमिनीलगतच्या पानांपासून या रोगाची सुरुवात होते. प्रथम पाने पिवळी पडतात आणि नंतर पानावर तपकिरी काळपट ठिपके दिसू लागतात. बारकाईने निरीक्षण केल्यास या ठिपक्यांवर एकात एक अशी वर्तुळे दिसतात.पाने करपून गळून पडतात. कित्येक वेळा फांदीवर आणि फळांवर ठिपके आढळून येतात. दमट व उष्ण हवेत या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
३) कॉलर रॉट / करकोचा : टोमॅटोची लागवड झाल्यानंतर लगेच हा अतिशय हानिकारक रोग होतो. याला ‘गल पडली’ असेही म्हणतात. तापलेल्या जमिनीमध्ये प्रथम पाऊस पडतो तेव्हा रोपांच्या उजव्या बाजूकडील शेंडा पिवळसर पाडण्यात होऊन करपा पडल्यासारखी लक्षणे दिसू लागतात व संपूर्ण शेंडा नंतर करपून प्रथम करड्या रंगाचा ठिपका असलेले व्रण नजरेस पडतो. आठ दिवसात अन्न व पाणी वाहक पेशी तोडल्या जातात आणि मग झाड कोलमडते. सहजासहजी हा रोग बरा होत नाही.
४) फळकुजव्या : पावसाच्या पाण्याचे थेंब देठावर पडून, तेथून सरकून देठाच्या बेचक्यात, देठ व फळ जेथे जोडले जाते तेथे शिरून फल कुजण्यास सुरुवात होते. देठाच्या भोवताली, फळाच्या तळाजवळ करड्या रंगाची रिंग स्पष्टपणे दिसते. चांगले दिसणारे फळ धरी नेल्यानंतर तिसऱ्या दिवशीच पूर्ण सडते, नासते. कुजलेली फळे प्लॅस्टिकच्या बदलीमध्ये किंवा पिशवीमध्ये तोडावी, खाली पडू देऊ नयेत. अशी तोडलेली फळे खड्ड्यामध्ये जाळून टाकून त्यावर एक फूट माती लोटून खड्डा बुजवून टाकावा. असे न करता शेतकरी ही फळे शेताच्या कडेला बांधावर फेकून देतात. त्यामुळे रोगांचा प्रसार झपाट्याने होतो.
५) पर्णगुच्छ किंवा बोकड्या : पाने सुरकुतल्यासारखी होऊन पानांची वाढ खुंटते व त्यांचा रंग फिकट हिरवा दिसतो. वाढीच्या सुरुवातीला रोग असल्यास फलधारण होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी रस शोशानाऱ्या किडींचे नियंत्रण करणे आवश्यक असते.
६) भुरी : हा रोग पानांवर व फुलांवर येतो. या रोगाची पांढरट पिठासारखी बुरशी पानाच्या पृष्ठभागावर व खालच्या बाजूस येते.

काढणी व उत्पन्न :
टोमॅटो हे १२५  ते १३० दिवसांचे पिक असून पुर्नलागवड केल्यानंतर साधारणपणे ३० ते ३५ दिवसात फूल लागते. गर्द पिवळी फुले फळधारणेस योग्य असतात. फिकट पिवळ्या रंगाची फुले नाजूक असून ती गळतात व फळधारणा होते नाही. साधारणपणे ५०-६० दिवसांत फळ लागण्यास सुरुवात होते. ६० ते ७० दिवसात फळांची तोड करता येते. सरासरी उत्पादन ३० ते ४५ क्विंटल प्रती एकर फळे निघतात.

- श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो
तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध
भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ.
वरील माहिती वाचून, संकलन करून ती
लेखाच्या स्वरूपात मांडत असतो... त्या
लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना
आपल्या कायद्यात "इंटेलेक्चुअल प्रोपर्टी
राईटस् (Intellectual Property rights)" या
रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे... तेव्हा
कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना,
लेखाला स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना
काळजी घ्या... मूळ लेखक कॉपीराईट
(Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ.
कलमांखाली आपल्यावर कारवाई करू शकतो...
या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष
तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या
प्रकारची शिक्षा होवू शकते...
आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही... मूळ
लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून
मेसेज पुढे पाठवू नका...

लवकरच वेबसाईट व एंड्रोईड एप चालू करत आहोत...

|| अन्नदाता सुखी भवः ||

अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..
🌾होय आम्ही शेतकरी 🌾
https://m.facebook.com/profile.php?id=98207582182286



कोई टिप्पणी नहीं: