src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

रविवार, 23 अक्तूबर 2016

शेतकरी असाल तर या पोस्ट लाइक कराल ओन्ली शेतकरी

 🌾होय आम्ही शेतकरी®🌾

आंबा मोहोर संरक्षण :

भारतात आंब्यांची लागवड सुमारे ४,००० वर्षांपूर्वीपासून होत असावी व त्याचे मूलस्थान आसाम, ब्रह्मदेश किंवा सयाम असावे, असे मानतात. आंबा फळ भारतात अत्यंत लोकप्रिय असून जगातल्या उत्कृष्ट फळांपैकी एक आहे. हिंदूंच्या अनेक धार्मिक विधींत याची पाने, मोहोर व फळे पवित्र व आवश्यक मानतात. कच्ची फळे (कैऱ्या) लोणची, मुरंबे व पन्हे यांकरिता आणि पक्की फळे खाण्यास व मिठाईकरिता उपयुक्त. खोडाच्या सालीतील टॅनिनामुळे ती कातडी कमावण्यास आणि रेशीम, सूत व लोकर रंगविण्यात वापरतात. लाकूड- बांधकाम, शेतीची अवजारे, खोकी इत्यादींकरिता उपयोगी पडते. पक्व फळ सारक, मूत्रल व गर्भाशयातून किंवा फुप्फुसातून होणाऱ्या रक्तस्रावावर उपयुक्त; बिया दम्यावर; फळाची साल स्तंभक (आकुंचन करणारी) उत्तेजक व शक्तिवर्धक. गुरे पाला आणि फळांच्या साली खातात.
आंबा हा फळांचा राजा आहे. हे जगमान्य झालेले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. महाराष्ट्रातील आंबा लागवडीखालील क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत आहे. राज्यात अनेक भागात आंब्याच्या केशर, लंगडा, पायरी, हापूस, रत्ना अशा अनेकविध वाणांची शेतकरी बांधवांनी लागवड यशस्वी केलेली निदर्शनास येते. आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा तसेच महारष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र ३,५७,२९० हेक्टर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होत असून त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळत आहे. हापूस आंब्यापाठोपाठ इतर विभागातील केशर आंबाही मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आंब्यापासून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
परंतु, दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होतांना दिसून येते. आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते. आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. जर पाऊस नियमित पावसाळा सोडून नोव्हेंबरमध्ये देखील पडत राहिला आणि थंडी पडायला उशीर झाला तर आंब्याची मोहोर येण्याची प्रक्रिया रखडते. त्यामुळे आंब्याला मोहोर उशिरा येतो. काही वेळा आपल्याला असे दिसून येते, की ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै किंवा ऑगष्ट महिन्यात ज्यावेळी भरपूर पाऊस सतत पडणे अपेक्षित असते त्यावेळी जर मोठा खंड पडला म्हणजे पाऊस न पडता १५ ते २० दिवस सारखे ऊन पडले तर अशा वेळेला बागेमध्ये आंब्याल मोहोर यायला सुरूवात होते. विशेषतः समुद्रानजीकच्या आंबा बागेमध्ये अवेळी मोहोर येण्याची उदाहरणे याकारणांमुळे आहेत. पावसाळ्यात आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले तर अशा आंब्याच्या झाडाला उशिरा मोहोर येण्याची दाट शक्यता असते. आंब्याची फुले १० ते ४० सेंमी लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिमी एवढी असे. आंब्याच्या फुलांना मोहोर अस म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. प्रमुख व दुय्यम पोषण द्रव्यांची कमतरता, संजिवकांचा आभाव, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव या सारख्या कारणांमुळे मोहोर गळ आणि फलगळ होते.
पॅक्‍लोब्यूट्राझोल वापरलेल्या बागांमध्ये उशिरा म्हणजे नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये मोहोर येण्याची दाट शक्‍यता असते. हमखास मोहोर येण्यासाठी २ मि.लि. क्‍लोरमेक्वॉट क्‍लोराईड प्रति लिटर या प्रमाणात दोन फवारण्या दहा दिवसांच्या अंतराने केल्यास फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर चार टक्के पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या दहा दिवसांच्या अंतराने केल्याससुद्धा मोहोर येण्यास मदत होते; मात्र आलेल्या मोहोराचे चांगल्या प्रकारे संरक्षण करून जास्तीत जास्त फळधारणा कशी होईल यावर लक्ष केंद्रित करावे लागते.
आंब्याची उत्पादकता ही मोहोरावरील कीड व रोगापासूनचे संरक्षण या बाबीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंबा मोहोराचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आंब्याच्या मोहोरावर प्रामुख्याने तुडतुड, फुलकिडे, मीजमाशी, शेंडा पोखरणारी अळी इत्यादी किडींचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोहोराचे अतोनात नुकसान होत असते. म्हणूनच याकिडींचा आणि भुरी रोगाचा बंदोबस्त करून मोहोराचे संरक्षण कसे करावे याबाबत लेखात मार्गदर्शन केले आहे.

कीड व्यवस्थापन :
आंब्यावर मोहोरावरील तुडतुडे, शेंडा पोखरणारी आळी, खोडकिडा, मिजमाशी, फुलकिडा, इ. किंडींचा प्रादुर्भाव होतो.
१) तुडतुडे :
आंबा बागेमध्ये मोहोर पूर्णपणे फुललेला असताना ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढूतो. तुडतुडे ही आंब्याची महत्त्वाची नुकसानकारक कीड असून या किडीच्या विविध २० ते २२ जातींची नोंद झालेली आहे. पैकी महत्त्वाच्या तीन जाती म्हणजे अॅम्रीटोडस अॅटकिनसोनी, इडिआस्कोपस क्लायपिअॅलीस आणि इडिओस्कोपस निव्हीओस्पार्सस या प्रजाती महाराष्ट्र राज्यात आंबा फळपिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अॅम्रीटोडस अॅटकिनसोनी हे काळसर करड्या रंगाचे, जास्त निमुळते व लांबट असतात. तर इडिओस्कोपस निव्हीओस्पार्सस जातीचे तुडतुडे हिरव्या करड्या रंगाचे, मध्यम आकाराचे आसतात. हे कीटक पाचरीच्या आकाराचे असतात. हे कीटक अत्यंत चपळ असून, त्यांची चाल तिरपी असते. मादी कोवळ्या पानांच्या आणि मोहोराच्या पेशीमध्ये, डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये सुमारे २०० अंडी घालते. या अंड्यांतून आठ ते दहा दिवसांत पिल्ले बाहेर पडून रस शोषण करावयास लागतात. त्यांची संपूर्ण वाढ १५ ते २० दिवसांत होते आणि त्यापासून प्रौढ तुडतुडे तयार होतात. पूर्ण वाढलेले आणि अपूर्णावस्थेतील तुडतुडे आंब्याच्या मोहोरातील कोवळ्या फुटीमधील तसेच लहान फळांमधील रस शोषूण घेतता. त्यामुळे मोहोर आणि लहान फळे गळून पाडतात. हे कीटक शारीरवाटे मधासारखा चिकट द्रव पदार्थ बाहेर टाकतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडे, फळे काळी पडतात. तसेच झाडाच्या अन्ननिर्मितिच्या क्रियेमध्ये आडथळा निर्माण होऊन वाढीवर तसेच फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास संपूर्ण मोहोर करपून जातो आणि जवळपास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत आंबा उत्पादनात घट येते.
नियंत्रणाचे उपाय :
• आंब्याची लागवड शिफारस केलेल्या अंतरावरच करावी. जास्त दाटी झालेल्या बागेत कमी सुर्यप्रकाश तसेच कोंदटपण जास्त असतो असे वातावरण किडींच्या वाढीस अनुकूल असते. म्हणून बाग स्वच्छ तणविरहित ठेवावी. झाडाच्या आतल्या भागातील फांद्याची छाटणी करून विरळ कराव्यात जेणेकरून सुर्यप्रकाश संपूर्ण झाडत पोहोचेल.
• जैविक नियंत्रणांतर्गत निंबोळी अर्क ५% किंवा निमयुक्त किटकनाशकांचा फवारणी करिता अधून - मधून वापर करावा. तुडतुडे वर्षभर झाडावर असल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी व्हर्टिसिलियम लेकॅनी या मित्र बुरशीवर आधारित कीटकनाशकाची २०५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी
• इमीडाक्‍लोप्रीड 3 मिली किंवा क्‍लोथीयानिडीन (दाणेदार) १.२ ग्रॅम किंवा थायामेथोक्‍झाम १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

श्री. विनायक शिंदे-पाटील, श्री. अंकुश चोरमुले आणि डॉ. कुणाल सुर्यवंशी

२) शेंडा पोखरणारी आळी :
आंबा फळपिकावरील ही एक महत्त्वाची कीड असून या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटीवर तसेच मोहोरावरही आढळून येतो. जेव्हा जेव्हा झाडाला किंवा कलामांना कोवळी फुट निघते. त्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव होतो. ज्यावेळी मोहोर सुरू होतो. त्यावेळी मोहोरावर सुद्धा या अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा पतंग काळसर बदामी रंगाचा असून त्याची लांबी १५ ते २० मि.मि. असते. या किडीची मादी (पतंग) कोवळ्या पानांच्या देठावर तसेच मोहोराच्या देठावर / दांड्यावर अंडी घालते. अंड्यातून ७ ते ८ दिवसांत पिवळ्या रंगाची अळी बाहेर पडते आणि पानाच्या देठातून शेंड्यामध्ये शिरून आतील भाग पोखरून खाते. अळीची वाढ होत असताना तिचा रंग गुलाबी होत जातो व त्यावर पांढरे ठिपके असतात. पानाच्या देठातून शेंड्यात/फांदीत शिरताना ती जे छिद्र पाडते. त्या छिद्रातून विष्ठा बाहेर येताना दिसते. अशी विष्ठा कोवळ्या पालवीवर आढळून आल्यास या किडींचा प्रादुर्भाव झाला असे समजावे. कोवळी पालवी, शेंडे किंवा मोहोर आतून पोखरले गेल्यामुळे सुकतात. बऱ्याचवेळी कीडग्रस्त फांदी झाडावर तशीच राहते आणि तिची जर पुढे वाढ झाली तर प्रादुर्भावाच्या जागी ती फुगीर होते. अशा फांद्या पोकळ राहिल्याने कालांतराने मोडून पडतात. रोपवाटिकेतील नवीन कलमांवर प्रादुर्भाव झाल्यास रोपे मरतात.
नियंत्रणाचे उपाय :
• नवीन लागवड केलेल्या बागेत या किडीचा उपद्रव जास्त असतो. कारण नवीन बाग वाढीच्या अवस्थेत असताना वारंवार नवीन कोवळी फुट येत असल्याने या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी वेळीच संरक्षण झाले नाही तर झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. म्हणून प्राथमिक अवस्थेतच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच किडग्रस्त शेंडे किडीच्या अवस्थेसह काढून जाळून नष्ट करावेत.
• कोवळी फुट निघल्यानंतर कार्बारिल ५० % प्रवाही ०.२% किंवा क्विनॉलफॉस २५ % प्रवाही ०.०५ % किंवा निंबोळी अर्क ५% किटकनाशकांची फवारणी करावी.

३)खोडकिडा :
कीटकाच्या मादीने झाडाच्या सालीवर घातलेल्या अंड्यातून निघालेल्या पिवळसर रंगाच्या अळ्या सालीखालचे खोडही पोखरतात. खोडावर लहान छिद्र व त्यातून गोंद आणि भुसा आलेला दिसतो. अळीने गाभा पोखरल्यामुळे फांदी किंवा खोड वाळून झाड मरते.
नियंत्रणाचे उपाय :
• खोडकिडीमुळे जे छिद्र पडते छिद्रामधून टोकेरी तार घालून आतील अळी बाहेर काढावी. या छिद्रामध्ये क्‍लोरपायरीफॉसच्या द्रावणात भिजवलेले कापसाचे बोळे तारेच्या सहायाने घुसवावेत. तोंड चिखलमातीने बंद करून घ्यावे. किडीच्या विविध अवस्था आतमध्ये मरून जातील.
• याच प्रमाणे, साधे पेट्रोल किंवा दोन भाग कार्बन डायसल्फाइड, एक भाग क्लोरोफॉर्म व क्रिओसोटाचे मिश्रण अळीने पाडलेल्या भोकात पिचकारीने मारून भोक चिखलाने बंद करतात. विषारी वाफेने अळ्या मरून जाऊन झाड वाचते.
• एखाद्या फांदीला जास्त प्रादुर्भाव आढळल्यास अशी फांदी काढून जाळून टाकावी.

🌾होय आम्ही शेतकरी®🌾

४) मिजमाशी :
ही आंबा फळपिकावरील दुय्यम महत्त्वाची कीड आहे. या किडीच्या मुख्यत्वे दोन प्रजाती आढळतात. त्या म्हणजे प्रोसिस्टिफेरस मँजीफेरी आणि इरोसोमिया इंडिका, पैकी इरोसोमिया इंडिका या प्रजातीचा प्रादुर्भाव मोहोरावर तसेच कोवळ्या फुटीवर मोठ्या प्रमाणात आढळतो. मीजमाशीची मादी माशी मोहोर फुटल्यानंतर कोवळ्या दांड्यामध्ये अंडी घालते. या अंड्यातून २ ते ३ दिवसात पिवळसर रंगाची अळी बाहेर आल्यानंतर देठाच्या आतील भाग खाते. देठाच्या खालच्या भागावर गाठ तयार होते. ही गाठ नंतर काळी पडते. अशा प्रकारच्या असंख्य गाठी किंवा काळे ठिपके मोहोराच्या देठावर आढळून येतात. अळी अवस्था ७ ते ८ दिवसांची असते. पूर्ण वाढ झालेली अळी तांबूस रंगाची असते. अळीची पूर्ण वाढ झाल्यावर ती गाठीला भोक पाडून जमिनीवर पडते व मातीमध्ये कोषावस्थेत जाते. कोषावस्था ५ - ७ दिवस असते. एका वर्षात या किडीच्या ३ ते ४ पिढ्या पूर्ण होतात. प्रादुर्भावीत मोहोर वेडावाकडा होतो. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास फुले व फळे गळून पडतात. फळे वाटणायाच्या आकाराची असतांना प्रादुर्भाव झाला तर फळे पिवळी पडून गळतात. दुसरी प्रजात प्रोसिस्टीफेरस मँजीफेरी ही मात्र मोहोरावरच आढळते. या मिजमाशीची अळी फळातील अंडाशय खाते. परिणामी फळधारणा न होता त्याजागी शंकुच्या आकाराची गाठ तयार होते. यालाच स्थानिक भाषेत 'दोडा' असे म्हणतात.
नियंत्रणाचे उपाय :
मीजमाशीची अळी जमिनीत कोषावस्थेत जाता असल्याने बागेतील झाडाखालील जमीन नांगरावी किंवा कुदळावी किंवा चाळणी करावी. जेणे करून सुप्तावस्थेतील किडीचे कोष उन्हाने तापून मरून जातील किंवा पक्षी वेचून खातील.
• झाडाखालील जमीन चाळल्यानंतर जमिनीमध्ये मिथील पॅराथिऑन या कीटकनाशकाची २% भुकटी मातीत मिसळावी. म्हणजे झाडाखालील जमिनीतील अळ्या आणि कोषांचे नियंत्रण होईल.
• आंब्याचा मोहोर फुटू लागताच फेनीट्रोथिऑन १ मिली किंवा डायमेथोएट १.२५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारणी कारवी.

५) फुलकिडे :
रोपवाटिकेतील आंब्याच्या कलमांच्या नवीन फुटीवर, झाडांच्या कोवळ्या पानांवर तसेच मोहोरावर या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. फुलकिडे आकाराने अतिशय सुक्ष्म असल्याने सहजपणे दिसत नाहीत. परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास किंवा मोहोर हाताच्या तळव्यावर झटकून पाहिल्यास असंख्य फुलकिडे हातावर पडलेले दिसून येतात. फुलकिडे पिवळसर आणि काळपट रंगाचे अशा दोन प्रजातीचे आपणास आंब्यावर दिसून येतात. या किडीची मादी कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते. अंड्यामधून ३ ते ८ दिवसांत पिवळसर रंगाची पिल्ले बाहेर पडतात. पिल्लावस्था १४ ते २१ दिवसांनी असते. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ फुलकिडे कोवळ्या पानांचा पृष्ठभाग खरडून आतील रसावर उपजिवीका करतात. प्रादुर्भाव झाल्यास विशेषत: मध्यशीर, उपशिरा तसेच पानांच्या कडा प्रथम विटकरी होतात. पाने वेडीवाकडी होतात. करपतात व पानगळ होते. अलिकडे या किडीचा प्रादुर्भाव मोहोरावर तसेच फळांवर देखील होत आहे. त्यामुळे मोहोराचे नुकसान होते. फळांची साल खरवडल्यामुळे ती खाकी, खडबडीत होते. फळांचा आकार लहान राहतो व बाजारातील प्रत घटते.
नियंत्रणाचे उपाय : फुलकिड्यांच्या नियंत्रणाकरिता किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोयेट ३०% प्रवाही ०.०३ %, फोझॅलोन ५० % प्रवाही ०.०५ %, निंबोळी अर्क ५% यापैकी एका किटकनाशकाची संपूर्ण झाडावर फवारणी करावी.

🌾होय आम्ही शेतकरी®🌾

रोग व्यवस्थापन :
आंब्यावर मोहोरावरील भुरी, करपा, पानावरील डाग, इ. रोग पडतात.
१) भुरी :
आंब्याच्या मोहोरावर येणारा 'भुरी' हा एक महत्त्वाचा बुरशीजन्य रोग असून आंब्याला जेव्हा मोहोर येतो त्याचवेळी पडतो. हा रोग ओइडियम मँजिफेरी कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) डिसेंबर-फेब्रुवारीच्या दरम्यान मोहोरावर पडतो. आंबा फळपिकावरील फारच नुकसानकारक असा हा रोग आहे. या रोगामुळे मोहरावर व दांड्यावर कवकाची पांढुरकी वाढ होते. या भुरी रोगाच्या बुरशीच्या वाढीसाठी तापमान २० ते २५ डी.से. आणि आर्द्रता ८० % हे अनुकूल वातावरण असते. जर ढगाळ वातावरण असेल आणि रात्रीचे तापमान कमी असेल तर भुरी रोगाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. रोगाचा प्रसार वा-यामुळे होतो. या बुरशीची बीजे कोवळ्या मोहोरावर किंवा पालवीवर उगवतात. त्यांची मुळे मोहोराच्या पेशींमध्ये शिरून अन्नरस शोषतात. सुरुवातीला रोगाची लागण मोहोराच्या शेंड्याच्या भागात होऊन नंतर इतरत्र पसरते. या सुमारास तुडतुड्यांचाही उपद्रव होतो व या दोहोंमुळे मोहोरातील रस शोषला जाऊन तो जळतो. फुले व लहान फळे गळून पडतात आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणत झाल्यास आंब्याच्या मोहोराचे जवळपास ७० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते.
नियंत्रणाचे उपाय : भुरी योगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या झाडावर हेक्‍झाकोनॅझोल ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) करपा :
ढगाळ वातावरण दिसून येत आहे. अशा वेळेस मोहोरावर किंवा छोट्या फळांवरती करपा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. हा रोग कॉलिटॉट्रिकम ग्लिओस्पोरिऑयडिसतसेच फोमॉप्सीस जातीच्या कवकामुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावाची विविध लक्षणे म्हणजे डहाळ्या वाळणे, फांद्यांचे शेंडे झडणे, मोहोर करपणे, पाने करपणे ही आहेत. पानांवर २० ते २५ मि.मी. व्यासाचे अंडाकृती किंवा अनियमित वेडेवाकडे फिकट विटकरी किंवा गडद विटकरी ठिपके पडतात. आर्द्र वातावरणात बुरशीची वाढ जलद होते. रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांपेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांची रोगग्रस्त देठे काळी पडतात, पाने खाली वाकतात, वाळतात, शेवटी गळून पडतात. पानगळ झालेल्या ठिकाणी काळे व्रण निर्माण होतात. रोगग्रस्त फांद्यांवर काळे ठिपके पडतात, फांद्यांचे शेंडे वरून वाळण्यास सुरवात होते. शेंडे झडल्याचे लक्षण दिसून येते. मोहरामध्ये फुलांच्या देठांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. उमललेल्या फुलांवरही छोटे काळे डाग पडतात. हे डाग मोठे होतात. नंतर मोहोर वाळतो. फळांवर सुरवातीस हे डाग गोल असतात; परंतु नंतर डागांचे एकत्रीकरण होते, मोठे अनियमित डाग तयार होतात. काही वेळा डागांमुळे संपूर्ण फळ पडते. डागांवर खोल चिरा निर्माण होतात. बुरशी फळात खोल शिरते व फळे नासतात.
नियंत्रणाचे उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम एक ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

श्री. विनायक शिंदे-पाटील, श्री. अंकुश चोरमुले आणि डॉ. कुणाल सुर्यवंशी

३) पानांवरील डाग :
हा रोग स्यूडोमोनस मँजिफेरी इंडिकी या सूक्ष्मजंतूमुळे होतो. रोगामुळे फारसे नुकसान होत नाही.

बांडगुळे : जुन्या आंबा झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणावर वाढतात. फांद्यांना अन्नपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात. उपाय म्हणून संबंधित फांद्या छाटून टाकाव्यात.

आंबा मोहोरच्या संरक्षणासाठी क्रायसोपर्ला कार्निया या परोपजीवी किडीच्या १० ते १५ हजार अळ्या प्रति हेक्‍टर झाडावर सोडाव्यात अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीवर आधारित कीटकनाशक चार ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे किंवा कार्बारिल (५० टक्के) २० ग्रॅम अधिक पाण्यात मिसळणारे ८० टक्के गंधक हे २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

🌾होय आम्ही शेतकरी®🌾

आंबा मोहोर संरक्षणासाठी वेळापत्रक :
१. ऑक्टोबरचा तिसरा आठवडा क्विनॉलफॉस २५% २० मिली + सायपरमेथ्रीन १०% ५ मिली + डायथेन एम-४५ ३० ग्रॅम + १० लिटर पाणी.
२. १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम + इमामेक्टीन बेंझोएट ५ ग्रॅम + १० लिटर पाणी.
३. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मिथिल डिमिटॉन २० मिली + ८०% सल्फर २० ग्रॅम + १० लिटर पाणी.
४. १ ते ५ डिसेंबर दरम्यान डायक्लोरोव्हॉस २० मिली + प्रोपिकोनॅझॉल ५ मिली + डायकोफॉल २० मिली + १० लिटर पाणी.
५. २० ते २५ डिसेंबर दरम्यान कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम + स्पिनोसॅड ५ मिली + १० लिटर पाणी
६. फळे साधारणपणे ज्वारीच्या आकाराची झाल्यानंतर जिब्रॅलीक ऍसीड १ ग्रॅम + ऍसिटोन ६० मिली किंवा अल्कोहोल १०० मिली + १ किलो युरिया + चिलेटेड झिंक २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.

प्रमाणे फवारण्या करून घ्याव्यात. वातावरणातील बदलानुसार फवारणीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. किड व रोग येवू नये याकरिता वेळीच काळजी घेवून त्यांच्या नियंत्रणाकरिता उपाययोजना करून मोहोराचे संरक्षण जर केले तर निश्चितच आंब्याच्या उत्पादनात भर पडण्यास मदतच होईल. कल्टारचा वापर बागेमध्ये करण्यात आलेला असेल तर विशेषतः रासायनिक खतांचे व्यवस्थापन, पिक संरक्षण आणि पाणी व्यवस्थापन या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
साधारणपणे आंब्याला डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात मोहोर येण्यास सुरुवात होऊन मोहोर फुटण्याची क्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत चालू राहते. वास्तविक मोहोर फुटण्यापुर्वीच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासूनच किटकनाशक फवारणीची सुरुवात करणे गरजेचे असते. तसेच संजीवकाच्या कमतरतेमुळे किंवा अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा झाल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यासही फळ गळ होते. अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास युरिया १ ते २ टक्के (१० ते २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे) तीव्रतेची फवारणी करावी. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. अशा ठिकाणी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या खतांची निम्मी मात्रा जमिनीद्वारा द्यावी. संजीवकामुळे कमतरता असल्यास नॅप्थिल ऍसेटिक ऍसिड २० पीपीएम (२० मिली ग्रॅम प्रति लिटर पाणी) या तीव्रतेची फवारणी करावी. काही वेळेस सायटोकायनिन या संजीवकामुळे फळगळ थांबविणे शक्‍य होऊ शकते. कारण सायटोकायनिनमुळे ऍबसेसिक ऍसिड या वाढ निरोधकाची उत्पत्ती झाडामध्ये थांबविली जाऊन फळाच्या देठाभोवती होणारी ऍबसेसिक पेशींची वाढ बंद होते. पर्यायाने फळ गळ रोखता येते. यासाठी साटोकायनिन गटातील सीपीपीयू या संजीवकाची फवारणी फळे वाटाणा किंवा गोटी आकाराची असताना करावी.
ज्या ठिकाणी पाण्याची उलब्धता असेल अशा ठिकाणी मोहरी एवढे आंबे किंवा त्याच्या पुढील वाटाणा किंवा अंडाकृती आंबे असतील अशा ठिकाणी पाणी देणे सुरू करावे. लहान झाडांना १० ते २० लिटर, मध्यम झाडांना ४० ते ५० लिटर मोठ्या झाडांना ६० ते ८० लिटर पाणी दर १५ दिवसांच्या अंतराने द्यावे.
तापमानातील चढ-उतारामुळे आंब्याला पुन्हा पुन्हा मोहोर येतो. साधारणपणे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये मोहोर येऊन फळे मोठी होऊन जानेवारीत अचानक थंडी पडल्यास त्याच मोहोराच्या बगलेतून पुन्हा मोहोर येतो. अशा वेळेस पहिल्या मोहोरातील मोठी फळे अन्नसाठा बंद झाल्यामुळे गळून पडतात. अशा वेळेस जिबरेलिन ५० ते १०० पीपीएम (५० ते १०० मिलि ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारावे. याचप्रमाणे युरिया १० ते २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून द्यावा. जेणेकरून पुन्हा-पुन्हा येणारा मोहोर रोखता येतो. गरजे प्रमाणे आपल्या नजीकच्या कृषी कार्यालायस किंवा कृषी विज्ञान केंद्रास किंवा कृषी विद्यापीठामध्ये संपर्क साधून अधिकची माहिती घ्यावी.

-श्री. विनायक शिंदे-पाटील, श्री. अंकुश चोरमुले आणि डॉ. कुणाल सुर्यवंशी

|| अन्नदाता सुखी भवः||

अधिक माहितीसाठी आपले फेसबूक पेज लाईक करा...

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866

कोई टिप्पणी नहीं: